भेट देणा-यांची संख्या

माझ्या शैक्षणिक ब्लॅागमध्ये आपले हार्दिक स्वागत आहे.संपर्क करा -८९९९९१३८९१

शुक्रवार, ७ एप्रिल, २०२३

पुस्तक परिक्षण(गावचा टिनोपाल गुरुजी)

वाचलेले पुस्तक (कादंबरी )

गावचा टिनोपाल गुरुजी

लेखक - शंकरराव खरात 

इंद्रायणी साहित्य प्रकाशन, पुणे

       वाचक हो, ही कादंबरी आहेत प्रतिथयश लेखक शंकरराव खरात यांची.

शाळा,शिक्षक व प्रशासन यांच्या गंभीर प्रवृत्तीवर विनोदात्मक,उपहासात्मक शैलीने प्रहार करणारी ही कादंबरी वाचकाला अंतर्मुख करते,वाचण्यास,विचार करण्यास प्रेरित करते.

कावळे नावाचा जात्यांध हुशार,धुर्त,कावेबाज,रगेल व रंगेल,मस्तवाल,पुढारपण करणारा शाळेचा उप-प्रमुख.टिनोपाल कपड्यातील ढवळा ठग गुरुजी, त्याच्याभोवती ही कादंबरी फिरते.सामान्य शिक्षकांचे वरचे म्हणजे शिक्षण खात्यातले अधिकारी,पण या कावळे गुरुजींच्या वरचे म्हणजे सभापती,चेअरमन,आमदार असे लोकप्रतिनिधी/पुढारी.

या लोकांच्यात राहणारा, त्यांच्यासोबतच फिरणारा ,लोंढा घोळणारा व शाळेला दांडी मारणारा हा दांडीबहाद्दुर गडी.या गुरुजीचे वरचे म्हणजे पुढारी हे नवीन समीकरच या कादंबरीतून वाचकाला समजते‌.सरपंचांना कन्हेरीच्या पानांचा,फुलांचा हार घातल्यावर इरसाल  कावळे गुरुजी सरपंचांना म्हणतो कसा,

 छे! छे!असं कसं,ही फुल देवालाही वाहतात! आपण सरपंच आम्हाला देवासारखे आहात!म्हणून तूम्हाला कन्हेरीचा हार घातलाय.या गुरुजींच्या बेताल वागण्यामुळे अडचणीत सापडलेले साधे,भोळे,कावेडावे न समजणारे,पेन्शनमध्ये जाऊ पाहणारे हेडमास्तर सिद्धेश्वर.

इरसाल,ढोंगी,लबाड सरपंच व त्याला असलेला बायांचा शौक व या शौकापायी विधवा व कुमारी शिक्षिकांना शाळेत नियुक्ती करण्याची विनंती करणारा.

या अबला, असहाय्य बायकांचे अब्रूचे लचके तोडणारा,शाळकरी पोरांकडून श्रमदानाच्या नावाखाली आपल्या शेतातला जुंधळा काढून घेणारा खलनायक,अतिलाचार,लाळघोट्या  सरपंच या कादंबरीत लेखकाने उभा केला आहे.

स्त्री शिक्षिकांना आपल्याच वाड्यात ठेवणारा हा सरपंच कुमारी शिक्षिका पारवे हिच्यावर वासनांध नजर ठेवून झडप घालण्याचा प्रयत्न करतो व शेवटी घायकुतीला आलेली ही पारवेबाई कावळे गुरुजीबरोबर बदलीसाठी मुक्कामी तालुक्याला जाण्यास तयार होते.तिथे हा लबाड कावळे गुरुजी तिच्या असहाय्यतेचा फायदा घेतो,वरून या कावळे गुरुजीचा हस्तक,लांगुलचालन करणारा बैले गुरुजी म्हणतो कसा,बाईची घडी मोडली का?सरपंचाच्या त्रासामुळे व बदलीच्या नावाखाली कावळे गुरुजी व त्याच्या पुढारी/अधिका-यांनी केलेले शोषणामुळे  व असहाय्य ताण यामुळे ही पारवेबाई आत्महत्या करते.या पारवेबाईच्या आत्महत्यानंतर झालेली पोलीस चौकशी,कावळेला बजावलेली निलंबणाची नोटीस व त्याला त्याने मी निलंबित झालो तर तुमचेही अंडी- पिल्ले बाहेर काढीन म्हणून अधिकाऱ्यांना दिलेले धमकीवजा आव्हानात्मक उत्तर.तसेच यात दोषी नसतानाही हेडमास्तर सिद्धेश्वर यांना झालेला त्रास व आलेली नोटीस.

या नोटिशीला पेन्शन नाही मिळाली तरी चालेल पण स्वाभिमानाने जगेल आणि खरं तेच बोलेल.आजचा शिक्षक तुम्ही पवित्र विद्येचे दान करणारा दाता म्हणून अधिक ठेवलाच नाहीत! राष्ट्राचे आधारस्तंभ निर्माण करणाऱ्या ध्येयवादी शिक्षकांचा तुम्ही आता मढं केलं आहेत. त्याला सर्व खात्यांचा आता हमाल केला आहेत.

 त्याला आता तुम्ही खरा विद्या देणारा शिक्षक ठेवलाच नाहीत,असे अधिका-यांना रोखठोकपणे उत्तर देणारा हेडमास्तर पाहून वाचकही चक्रावून जातो.

मथुराबाई  घारे या तरूण,सुंदर, विधवा  शिक्षिकेची  या गावात झालेली बदली व तिचे अनेकांबरोबर असलेली लफडी,तसेच गावकऱ्यांनी तिची बदली करावी म्हणून केलेल्या तक्रारी ,खाते चौकशी,झालेली बदली हा विषय या कादंबरीमध्ये मध्यवर्ती फिरत राहतो.

मध्यवर्ती प्रसंग,घटना या रंजक होत जातात व कादंबरीत वाचकाला खिळवून ठेवतात.लेखकाची असलेली लेखनावरची पकड तसेच वाचकाची उत्सुकता, जिज्ञासूपणा कायम टिकवून ठेवण्यात ते यशस्वी झाले आहे‌.पानंपान वाचत असताना वाचक मंत्रमुग्ध होऊन जातो.वाचकाची रसग्रहणता टिकवुन ठेवण्याची विलक्षण हातोटी लेखकाच्या अंगी आहे.प्राथमिक शाळा व त्या शाळेमधील शिक्षक व साधा,सरळ,भोळा सरळमार्गी हेडमास्तर सिद्धेश्वर.याच्या उलट वस्ताद,अवलादी,कुरघोड्या करणारा व शेंडी लावणारा,टांग घालणारा,बोलघेवढा कावळे मास्तर व त्याला खोट्या,भ्रष्ट कामात साथ देणारा  बैलेगुरुजी,मजबूर मथुराबाई नावाची विधवा मास्तरीण.आपल्या एकुलता एक दहा वर्षाच्या मुलासाठी नाईलाजाने विधवापनानंतर शिक्षण घेऊन नोकरी करणारी व कावळे गुरुजीच्या कचाट्यात सापडलेली, सरपंचाची,पंचाची शिकार झालेली अबला.शिक्षणाधिकाऱ्याने निलंबनाची नोटीस बजावल्यानंतर तिने या आडवळणी,खेडवळ गावात झालेल्या अन्याय अत्याचाराची संपूर्ण कहाणी न घाबरता कथन केली,जबाब दिला,त्यामुळे या बाईंचे निलंबन न होऊन त्यांची फक्त बदली करण्यात आली.


कावळे गुरुजींचा असलेला वरचा दांडगा संपर्क व अधिकारी,पदाधिकाऱ्यांना खुश करण्याची हातोटी यामुळे त्यांने शाळेमधील सर्व योजनांची,शिक्षणाची पूरती वाट लावली होती व आपल्याला आदर्श शिक्षक म्हणून राष्ट्रपतीपदक मिळावे म्हणून हा बिनकामाचा मास्तर फिल्डिंग लावत होता.


पारवेबाईला बदलीच्या कामासाठी तालुका व जिल्ह्याला मुक्कामी घेऊन जाणारा व मौक्का घेऊन चौका हाणणारा, शोषण करणारा हा कावळे गुरुजी पेशाला,शिक्षणव्यवस्थेला कलंक आहे.

या कावळे गुरुजीमुळे सुनीताबाई पारवे या कुमारी शिक्षकीने वैतागून आत्महत्या केली.शालेय सकस आहारामधील कोंबडी फार्म मधील कोंबड्या,अंडी खाऊन स्वतः,गोंडस, गुटगुटीत झालेल्या कावळे गुरुजींनी आपल्या वरच्यांनाही याच कोंबडीच्या मटनाचा झणझणीत रस्सा खाऊ घालून नेहमी खुश ठेवले व त्यांच्या पुढे पायघड्या घातल्या.

मुलांना दूध हवे म्हणून सकस पोषण आहार योजनेंतर्गत म्हशी पाळणारी ही शाळा,म्हशीचे दूध मात्र ज्या शिक्षकांकडे या कामाचा चार्ज होता तोच खातपीत  होता.पोरांना ते दूध काय पचत नाही म्हणून व वरचे अधिकारी एवढा अमाप काळा पैसा, काळे धन जमा करत असताना आम्ही फक्त म्हशीचे दूध पिले तर काय बिघडले अशी मखलाशी करतो. मास्तरांनांच दुधाचा रतीब लागला व पोरांना मात्र या सकस आहार योजनेचे दूध काही मिळाले नाही. त्याचे लाभार्थी स्वतः शिक्षकच. वरचे अधिकारी व पदाधिकारी यांच्या घरी मात्र  नियमितपणे लोण्याचे डबे पोहोचवले जात होते.

या पद्धतीने शैक्षणिक क्षेत्रातील भ्रष्ट कारभार लेखकांने चव्हाट्यावर आणला आहे.

शाळेच्या मुलांसाठी असलेल्या सकस आहार योजनेच्या कोंबड्या,अंडी,भाजीपाला व दूध कावळे गुरुजी व त्याचे साथीदार वरल्या पुढार्‍यांना खाऊ घालत होते व त्यांच्या रंगीत-संगीत पार्ट्या रंगत होत्या.या पार्ट्यांचे गुलाबी व रसभरीत वर्णन लेखकाने या कादंबरीत केलेले आहेत, ते वाचकांचे लक्ष वेधून घेते.विद्यादान हेच महत्त्वाचे मानणारे हेडमास्तर सिद्धेश्वर गुरुजी,वाघमारे गुरुजी व नवे शिक्षक पण भाषा,गणित, समाजशास्त्र हे विषय शिकवण्यापेक्षा मुलांना रोज श्रमदान, ग्रामगौरव व पाहुणचार शिकवावा या मताचे असणारे कावळे गुरुजी व त्यांचा साथीदार बैले गुरुजी तसेच मथुराबाई हे विक्षिप्त शिक्षक.

या विचारांच्या शिक्षकांनी शिक्षणाचा खेळखंडोबा करण्याचा जणु विडाच उचलला होता,अशा पद्धतीने शिक्षण व्यवस्थेचे दारुण चित्रण,मनाला वाटेल तसा योजना, उपक्रमांचा अर्थ लावुन वेळापत्रक तयार करणारा कावळे गुरुजी हा कादंबरीचा मुख्य विषय वास्तु आहे. भ्रष्ट,किडलेली शैक्षणिक व राजकीय व्यवस्था याचे ज्वलंत चित्रण लेखकाने या कादंबरीतून वाचकांपुढे सादर केलेले आहेत‌

मुलांच्या भाषा, गणित शिक्षणाची वाट लावू पाहणारा, मद्यपान करणारा,टिनोपालच्या कपड्यांमध्ये वावरणारा हा स्त्रीलंपट कावळे गुरुजी.त्याचे कुचरित्र,अप्रमणिकपणा या गोष्टी कादंबरीमधून लेखकाने सुज्ञान वाचकांपुढे मांडलेल्या आहे.

अशी ही अभद्र,बिनकामाची,पुढारपण करणारी मास्तरांची पिल्लावळ जन्माला येत असून तीच खरे आदर्श शिक्षक आहे असं जनतेलाही वाटावं अशी परिस्थिती हल्लीच्या काळात दिसून येत आहेत. ही विचार करण्यासारखी गोष्ट असून सुज्ञ लोकांनी खरे खोटे वेळीच ओळखून याला पायबंद घालण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे असे लेखकाला अभिप्रेत असावे असे मला वाटते.

भ्रष्ट शिक्षण व्यवस्थेमध्ये आंधळा दळतो आणि कुत्रं पीठ खातं अशी अवस्था झालेली दिसते. गैरशिस्तीच्या शिक्षकांना खात्याने शासन करावं म्हणून वर रिपोर्ट करणारे हेडमास्तरलाच निलंबित करावं अशी ही सडलेली शिक्षण व्यवस्था. चोर सोडून संन्यासाला फाशी देणारी ही शिक्षण व्यवस्था निर्दोष माणसालाही दोषी सिद्ध करण्यास मागेपुढे पाहत नाहीत. काम करणाऱ्यांना टिपायला बसलेली ही प्रशासन नावाची यंत्रणा काम न करणाऱ्यांना मात्र मिरवत असते हेच यातून दिसून येते. शिक्षक हा शिक्षक आहे.विद्यादान हेच त्याचे पवित्र कर्तव्य आहेत.याच भावनेनं त्याच्याकडे पाहिले पाहिजेत. त्याला इतर कामांच्या ओझ्यातून-बोजातून मोकळा केला पाहिजे आणि शिक्षणाच्या पवित्र कार्यालाच त्याला जुंपला पाहिजेत. त्यातूनच तो राष्ट्राचे खरे आधारस्तंभ निर्माण करेल.शिक्षकाला आता अनेक वरचे-खालचे साहेब झालेत,अनेक बाप झालेत.त्याला पहिल्यागत एकच साहेब ठेवा ! उदाहरण घेऊन खरं सांगावयाचं झालं तर ,एकाच नव-याजवळ बाई सुखाने नांदते,सुखाने संसार करते.नाहीतर तिच्या संसाराची धूळधाण होते. अशीच आमच्यासारख्या शिक्षकांची अवस्था झाली आहेत असे लेखकाला या कादंबरीमधून सांगावसे वाटते.ही प्रेरणा घेऊनच आपण ही कादंबरी वाचावी एवढी आपणास नम्र विनंती.

वाचक मित्रांनो, या कादंबरीतील हा कावळे गुरुजी म्हणजे आजच्या भ्रष्ट प्रशासकीय व्यवस्थेतील प्रातिनिधीक उदाहरण आहेत.असे कावळे समाजात आजही अनेक असून त्यांचाच उदो उदो होताना दिसतो आहे.प्रामाणिक, होतकरू, कामाशी काम ठेवणाऱ्या शिक्षकांना कोण विचारतो?

येथे खाऊ पिऊ घालणारे,सत्कार करणारे शिक्षकच अधिक चांगले व योग्य असं आज तरी चित्र आहेत.

भाषांतर करा